बघावं तिकडं फक्त मराठाच

कोपर्डी घटनेनंतर राज्यभर मराठा क्रांती मूकमोर्चाचे लोण पसरले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. औरंगाबादने मराठ्यांच्या आक्रोशाला पहिल्यांदा वाट मोकळी करून दिली.
 त्यानंतर आपापल्या जिल्ह्यात सकल मराठा समाज बांधव एकत्र येऊ लागले. आधी झालेल्या मोर्चाचे सगळे विक्रम नंतरचा मोर्चा मोडीत काढत आहे.
 एकेका जिल्ह्याचा अनुभव लक्षात घेता पुढील जिल्हा त्रुटी  व कमतरता दूर करून आणखी विक्रमी मोर्चाकडे झेप घेत आहेत. कुणाचेही नेतृत्व न स्वीकारता एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मोर्चे निघत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
 सातारा ही तर ऐतिहासिकदृष्ट्या मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या राजधानीतील मराठा क्रांती मोर्चा तेवढाच ऐतिहासिक ठरण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
 तरुण पिढीसह अबालवृद्धांनी त्यासाठी आपापल्यापरीने आवश्यक ती जबाबदारी उचलली आहे. कोणीही अर्थकारणाचा विचार करत नाही. आपल्या समाजासाठी सर्व काही विसरून वाटेल ते करण्याची तयारी मराठा बांधवांनी केली असून नियोजनादरम्यान त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. प्रत्येक मराठा झपाटून कामाला लागला असल्याचे चित्र  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *