देशाची अर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे देशातील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे. येथील लोकांकडे एकूण 820 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून शहरात 45 हजार कोट्याधीश तर 28 अब्जाधीश आहेत. श्रीमंतीच्या बाबतीत मुंबईनंतर दिल्ली आणि बंगळुरु यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.
यासंदर्भात न्यू वर्ल्ड वेल्थने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, दिल्लीवासीयांकडे 450 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून शहरात 22 हजार करोडपती तर 18 अब्जाधीश आहेत. याचप्रमाणे बंगळुरु शहरातील नागरिकांकडे 320 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती असून 7,500 कोट्याधीश तर 8 अब्जाधीश आहेत. एकूण संपत्तीचा संबंध शहरातील नागरिकांकडे असलेल्या खासगी मालमत्तेशी आहे.
सर्व्हेक्षणात देशात एकूण 5600 अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून 2 लाख 64 हजार कोट्याधीश तर 95 अब्जाधीश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल करणार्या अन्य शहरांमध्ये सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, चंदीगड, जयपूर तसेच बडोदा आदी शहरांचा समावेश आहे. आगामी दशकात देशात स्थानिक अर्थ सेवा, आयटी, रिअल इस्टेट, आरोग्य व माध्यमांच्या क्षेत्रात जोरदार प्रगती होण्याचा अंदाजही या सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आला आहे. ज्यांच्याकडे 10 लाख डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक निव्वळ संपत्ती आहे अशांचा कोट्याधिशांमध्ये तर ज्यांच्याकडे एक अब्ज डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त निव्वळ संपत्ती आहे अशांचा अब्जाधीशांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
इतर श्रीमंत शहरांमध्ये हैदराबाद (एकूण संपत्ती 310 अब्ज डॉलर्स, 8200 कोट्याधीश, 7 अब्जाधीश), कोलकाता (एकूण संपत्ती 290 अब्ज डॉलर्स, 8600 कोट्याधीश, 10 अब्जाधीश), पुणे (एकूण संपत्ती 180 अब्ज डॉलर्स, 3900 कोट्याधीश, 5 अब्जाधीश), चेन्नई (एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर्स, 6200 कोट्याधीश, 4 अब्जाधीश), गुडगाव (एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर्स, 3600 कोट्याधीश, 2 अब्जाधीश)
