काजोलसाठी साकारला सुवर्ण ताजमहाल!

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या आणि सर्वच प्रेमी युगुलांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाच्या अशा ताजमहालाची सुवर्ण प्रतिकृती काजोलने चक्क परिधान केली होती. काजोलने ताजमहाल कसा परिधान केला असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर खुद्द काजोलनेच दिले आहे.
ताजमहाल हा जगभरात प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाची कथा सांगणारी ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू सर्वांनाच भुरळ पाडते. ताजमहालने आजवर अनेकांना आपल्या प्रेमात पाडले आहे. त्यात आता आणखी एका व्यक्तीचे नाव जोडले गेलेय ते म्हणजे काजोल देवगण. सध्या काजोल ही अजय देवगणच्या निर्मिती अंतर्गत बनलेल्या ‘शिवाय’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात व्यग्र आहे. यूएस टूरवेळी ‘शिवाय’ चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान काजोलने एक साडी परिधान केली होती. त्यात तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले होते. पण या पेहरावात विशेष लक्ष वेधले ते तिच्या ब्लाउजवरील डिझाइनने. अगदी साध्या अशा काळ्या रंगाच्या ब्लाउजवर सोनेरी नक्षीकामाने ताजमहालची प्रतिकृती साकारण्यात आली होती.  ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यासाचीने खास करून काजोलसाठी डिझाइन केली होती. यातून केवळ काजोलची फॅशनच नाही तर तिचे भारताप्रती असलेले प्रेमही दिसून येते.
अजय देवगणने दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय केलेला ‘शिवाय’ चित्रपट येत्या दिवाळीत २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रसिद्धीची संपूर्ण धुरा काजोलने सांभाळली असून ती पावलोपावली अजयला साथ देताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *