मुंबईत अग्निशमन दलासाठी फायर हायड्रंट पुनर्जीवित करण्याची मागणी होत असताना ब्रिटिश काळातील तब्बल ६६ पाण्याच्या टाक्यांचा शोध महापालिकेला लागला आहे.
सेंट झेवियर्सचे प्राध्यापक व शिवसेना नगरसेवक अवकाश जाधव यांनी फोर्ट, कुलाबा परिसरातील सहा पाण्याच्या टाक्यांचा शोध घेतल्यानंतर ब्रिटिशांनी बांधलेल्या मुंबईतील प्रत्येकी अडीच लाख लिटर क्षमतेच्या ६६ पाण्याच्या टाक्या शोधून काढल्या. या सर्व टाक्या वापरात नसून त्यातील ५३ टाक्याच सुस्थितीत आहेत. त्यामुळे या सर्व टाक्यांचे जतन केल्यास कार्यालय इमारती व आपत्कालीन परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाला त्याचा वापर होऊ शकतो.
या देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना पाण्याच्या साठवणुकीसाठी जलाशये बांधली. अडीच लाख लिटर क्षमतेच्या या पाण्याच्या टाक्या मुंबईभर असून महापालिका ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतच ही संख्या सहा आहे. फोर्टमधील शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाजवळील पालिकेच्या पाटीवरून अवकाश जाधव यांनी हा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना पाण्याची टाकी असल्याचे लक्षात आले.
याची कल्पना ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिल्यांनतर त्यांनीही इतर जलस्त्रोतांचा शोध घेतला होता. यात सेंट जॉर्ज रुग्णालय, पोलीस मुख्यालय,जे. जे. आर्ट्स आदींसह सहा ठिकाणी अशा प्रकारे पाण्याच्या टाक्या असल्याचे आढळून आले.
जुने दस्तऐवज तपासल्यानंतर शहर भागातील अशा प्रकारे ६६ ब्रिटिशकालीन टाक्या दिसून आल्या. त्यापैकी १३ पाण्याच्या टाक्याच गडप झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे आढळून आले. केवळ ५३ पाण्याच्या टाक्या अशा आहेत की त्यांचे जतन करून पुनरूर्जिवन करता येवू शकते.
पोलीस मुख्यालयाची नवीन इमारत पाण्याच्या टाकीवर
पोलीस मुख्यालयाची नवीन इमारत पाण्याच्या टाकीवर बांधण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पालिकेने गृहविभागाला याची नोटीस बजावली होती. परंतु त्यावेळी पोलिसांनी ही नोटीस स्वीकारली नसल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिका-यांकडून सांगण्यात येते.
नवीन आराखडयात टाक्यांचे आरक्षण टाकण्याची मागणी ब्रिटिशांनी प्रत्येकी अडीच लाख लिटर्स क्षमतेच्या ६६ पाण्याच्या टाक्या बांधल्या होता. हे लक्षात घेता १६ दशलक्ष लिटर अर्थात पावणे दोन कोटी लिटर इतका पाणीपुरवठा या टाकीतून होऊ शकतो.
मेट्रो सिनेमाजवळ जेव्हा आग लागली तेव्हा म्युझियममधील पाण्याच्या टाकीची कल्पना असती तर मोठी मदत झाली असती. आता जलस्रेत उघड झाल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाण्याचे जतन करावे, अशी आपली मागणी असल्याचे जाधव यांनी सांगितले. पाण्याचे भविष्यात जतन करण्यासाठी व त्यावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी आगामी विकास नियोजन आराखडयात या टाक्यांचे आरक्षण टाकले जावे, अशीही मागणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्यांच्या टाक्यांचे विभाग व संख्या
» ए (कुलाबा ते सीएसटी) : ०६
» बी (मस्जीद,मदनपुरा) : ०७
» सी (चंदनवाडी,गिरगाव) : ०४
» डी (ग्रँट रोड) : ०७
» ई (भायखळा) : ०८
» एफ/दक्षिण (शिवडी,परळ,लालबाग): १२
» एफ/उत्तर (शीव ते वडाळा) : ०८
» जी/दक्षिण (प्रभादेवी,वरळी,लोअर परळ) : ०८
» जी/उत्तर (दादर,माहीम,धारावी) : ०६