श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी वेगाने सुरू झाली असून आज (ता. 26) गाभाऱ्याची स्वच्छता होणार आहे. त्यासाठी गाभारा बंद राहणार असून मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र, उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. यंदाही मंदिराचे शिखर एलईडी दिव्यांनी उजळणार असून गुरुवारी विद्युत जोडणीची चाचणी होऊन शिखर उजळून निघेल. दरम्यान, तुळजाभवानी मंदिरासह नवदुर्गा मंदिरातही नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला असून मंदिर परिसराची स्वच्छता आणि रंगरंगोटीला प्रारंभ झाला आहे.
महालक्ष्मी मंदिरात काल चांदीच्या पालखीसह पादुका, पंचारती, धुपारती अशा चांदीच्या वस्तू व अलंकारांची स्वच्छता झाली. गरूड मंडपासह महाव्दार आणि दीपमाळांचीही स्वच्छता झाली. चारही मुख्य दरवाजांजवळील वायरिंग बदलले असून दर्शन मंडपाचे काम वेगाने सुरू आहे. मंदिराच्या आवारातील मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. उत्सव काळात मंदिरात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची अंतिम यादी तयार होत असून दोन दिवसांत ती प्रसिध्द केली जाणार आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने उत्सवापूर्वी मंदिर परिसरात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. त्याशिवाय दोन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहेत.