उस्मानाबादकरांना वरुण राजा पावला

पाण्यासाठी तासंतास टँकरची वाट पहाणं. टँकर आला की हंडाभरपाण्यासाठी जीवावर उदार होणं. गेल्या चारवर्षांपासून उस्मानाबादमध्ये असंच चित्र दिसत होतं. मात्र चारच दिवसांत जिल्ह्यातलं हे चित्र पालटून गेलं.

दुष्काळानं ग्राससेल्या उस्मानाबादकरांना वरुणराजा चांगलाच पावला आहे. जिल्हयात मागील 4 दिवसांपासून सर्वदूर असा दमदार पाऊस बरसला. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 92 टक्के पाऊस झालाय. या दमदार पावसानं कोरडीठाक पडलेले नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. या पाण्यानं बळीराजाची सारी चिंता धुवून काढली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हयात अनेक ठिकाणी नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं झालीत. जिल्हयात एकूण लघु, मध्यम आणि मोठे असे मिळून 216 तलाव, सिंचन प्रकल्प आहेत. यातील लहान तलावातील 67 प्रकल्पात 100 टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा अनेक महिन्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे.

चारच दिवसांत वरुणराजानं दुष्काळाचे चटके सोसणा-या उस्मानाबादचं चित्र पालटून टाकलंय. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवणारा हा पाऊस बळीराजासाठी खरी दिवाळी घेऊन आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *