अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न- उद्धव ठाकरे

काळ्या वेषातील ४ अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असे लोकांना वाटू लागल्याचे मत सामन्याच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले आणि सर्व ‘प्रौढ’ मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?, असाही खोचक सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. यानिमित्ताने सर्व यंत्रणा कामास लागल्या. दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम झाली. उरणच्या शालेय विद्यार्थ्यांनी चार बंदूकधारी पाहिले व हे चार बंदूकधारी नंतर अदृश्य झाले. आता हे चार बंदूकधारी आहेत ते जमिनीत गडप झाले नाहीतर हवेत विरून गेले. कारण नौदल, हवाई दल, पोलीस यंत्रणेने जंग जंग पछाडूनही हे चार बंदूकधारी हाती लागलेले नाही, असं सामन्याच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी मत मांडलं आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

-दिल्लीहून  आठ तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. एकंदरीत काय तर संपूर्ण उरण शहरास व आजूबाजूच्या गावांस पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सरकारने अतिसावधान असायलाच हवे. राष्ट्राच्या व जनतेच्या सुरक्षेसाठी हे सर्व आवश्यक आहे, पण उरणमध्ये घुसलेले चार संशयास्पद लोक हे खरोखरच बंदूकधारी दहशतवादी असावेत का? यावर तपास यंत्रणांनी चिंतन करण्याची गरज आहे. उरणमध्ये इतका कडेकोट बंदोबस्त आहे की, तिथे आता मुंगीही शिरणार नाही व बाहेरचे पाखरूही फडफडणार नाही. त्यामुळे आता शिरलेले चार संशयास्पद बहुधा आतल्या आतच गुदमरून  प्यारे होतील. २६-११च्या वेळी जी सतर्कता दाखवायला हवी होती ती उरणच्या बाबतीत दाखवली जात आहे. पठाणकोट व उरीच्या लष्करी तळांबाबत जी गफलत झाली (असे संरक्षणमंत्री कबूल करतात) ती उरणच्या बाबतीत होणार नाही.

-चार संशयास्पद अतिरेक्यांची अफवा पसरवून पोलीस यंत्रणेस गुंतवून ठेवायचे आणि दुसर्‍याच एखाद्या जागी घातपात घडवायचे असे कारस्थान तर कोणी रचत नाही ना हेसुद्धा पाहावे लागेल. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात परिस्थिती इतकी नाजूक आहे की, लहानशा अफवेनेसुद्धा राजशकट कोलमडून पडेल अशी भीती वाटावी. लोकांची मने कमालीची अस्थिर बनली आहेत. देशाचे जवान, लष्करी तळे जिथे सुरक्षित नाहीत तिथे आम्हा पामरांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्‍न लोकांच्या मनात आलाच असेल तर ते चुकीचे ठरू नये.

-‘मराठा’ मोर्च्यांची धडक बसत असल्याने अनेकांच्या खुर्च्या हलू लागल्या आहेत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे चार काळ्या वेषातील अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असेही लोकांना वाटू लागले. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले व सर्व ह्यप्रौढह्ण मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *