मराठवाडा-कळंब तीन वर्षांनंतर दुथडी भरून वाहू लागली वाशिरा

तालुक्‍यातील इटकूर भागात बुधवारी (ता. 21) सायंकाळी दमदार पाऊस झाल्याने वाशीरा नदी तब्बल तीन वर्षांनंतर दुथडी भरून वाहू लागली आहे. परिसरातील नद्यांचे पाणी थेट मांजरा धरणाला मिळत असल्याने मांजरा धरणात पाणीपातळी वाढू लागली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील नद्या, नाले कोरडेठाक पडले होते. यंदाच्या पावळ्यात नद्या, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, नाल्यांना भरपूर पाणी येईल, अशी आशा होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. परतीच्या पावसाने सर्वांचे भले केले आहे. आतापर्यंतच्या पावसाच्या नोंदीवर नजर टाकल्यास सर्वांत कमी पाऊस तालुक्‍यात झाला आहे. अद्यापही सर्वदूर पावसाचे आगमन झालेले नाही. कुठे कमी, कुठे जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील इटकूर भागात जोरदार पाऊस झाल्याने गावाजवळील नदी व वाशिरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. नदीची लांबी 14 किलोमीटरच्या दरम्यान आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडून इटकूर- पारा रस्त्यावरील वाशीरा नदीचे 400 मीटरपर्यंत तर याच नदी वर बोरगाव (धनेश्‍वरी) गावाच्या बाजूला 600 मीटर भोगजी रस्त्यावरील अडीच किलोमीटरपर्यंत नदीचे खोलिकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले आहे. भोगजी रस्त्यावरील नदीचे खोलीकरण लोकसहभाग, खासदार निधी, राष्ट्रीय स्वयंसंघ, लोकमंगल उद्योग समूह आदींच्या सहकार्यातून करण्यात आले आहे. त्यामुळे वाशिरा नदीला पाणी आल्याने एकाद्या तलावात पाणी साठून राहाते, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर पाणी आल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
नद्या, नाले पाण्याने खळखळून वाहिल्यास विहीरी, कूपनलिकेच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे रब्बी हंगाम जोमात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्‍यातील कोठाळवाडी येथील साठवण तलावाच्या पायथ्यासी असलेल्या सार्वजनिक विहिरीद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र तलावाच्या परिसरात पाऊस न झाल्याने तलावात पाणीसाठा अद्यापर्यंत झालेला नाही. त्यामुळे गावाचा पाणीप्रश्‍न अद्याप मिटला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *