कर्नाटक – कावेरीचे पाणी फक्त पिण्यासाठी

कर्नाटक – कावेरीचे पाणी फक्त पिण्यासाठी

कावेरीच्या चारही जलाशयांतील पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्यात येईल. अन्य कोणत्याही कारणासाठी त्याचा वापर करता येणार नाही, असा सर्वपक्षीय ठराव कर्नाटकने शुक्रवारी विशेष अधिवेशनात केला. तमिळनाडूला सहा हजार क्‍यूसेक पाणी सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर चर्चा करुन ठराव करण्यासाठी कर्नाटक सरकारने आज विधानसभेचे विशेष अधिवेशन घेतले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांनी ही ठराव सभागृहात मांडला. संयुक्त जनता दलाचे नेते वाय. एस. व्ही. दत्ता यांनी त्याला अनुमोदन दिले. विधान परिषदेत हा ठराव भाजपचे सी. टी. रवी यांनी मांडला व कॉंग्रेसचे व्ही. एस. ऊगरप्पा यांनी अनुमोदन दिले. विधान परिषदेचे अध्यक्ष डी. एच. शंकरमूर्ती यांनी सभागृहातील चर्चेनंतर हा ठराव मंजूर केला.

कावेरी खोऱ्यात यंदा चांगला पाऊस झाला नसल्याने तेथील जलाशयांमधील पाण्याची पातळी खालवली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही परिस्थिती धोकादायक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. माजी मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी ठरावावर बोलताना म्हणाले, “”बंगळूर, म्हैसूर व मंड्या या जिल्ह्यांसाठी पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविणे आवश्‍यक आहे हे लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना भात व ऊस यांसारखी मुबलक पाणी लागणारी पिके न घेण्याचे आवाहन केले असताना शेजारच्या राज्यातील पिकांसाठी पाणी सोडणे कसे शक्‍य आहे?‘‘ हा ठराव न्यायलायाचा अवमान करण्यासाठी नसून राज्यातील शेतकरी व नागरिकांचे हित जोपासण्यासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सर्व आमदारांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे, असा अध्यादेश कॉंग्रेस, भाजप व संयुक्त जनता दल या पक्षांनी काढला होता. कावेरी खोऱ्यात पुरेसे पाणी नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते तमिळनाडूला देणे राज्य सरकारला शक्‍य नाही, असे म्हणणे मांडून सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करावा, असे ठरले होते. कावेरी प्रश्‍नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र सरकारशी सहमती दर्शवित भाजपनेही या अधिवेशनात सहभाग घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मोडून पाणी देण्यास नकार देणे म्हणजे न्यायालयाचा अवमान करण्यासारखे असल्याने सिद्धरामय्या यांनी प्रश्‍न अत्यंत सावधगिरीने हाताळला. सहकारी मंत्री, विरोधी पक्षांते सदस्यांशी त्यांनी चर्चा केली. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन सल्ला घेतला होता. सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले होते.

पावसाचा हात आखडता
कर्नाटकमध्ये पावसाने आखडता हात असल्याने यंदा राज्यातील परिस्थिती बिकट आहे. मात्र कावेरी खोऱ्यातील पाण्याची टंचाईची निश्‍चित माहिती 31 जानेवारी 2017 नंतर कळू शकेल, असे मत दोन्ही सभागृहांत व्यक्त करण्यात आले. कृष्णराजसागर, हेमावती, हारंगी व काबिनी तलावांत मिळून 27.6 टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे. हे पाणी कावेरी खोऱ्यातील गावे व बंगळूरसाठी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *