साडीचा पदर खोवण्यापासून बॅगेची चैन वेळप्रसंगी लावण्यासाठी आपल्याला मदत करते ती सेफ्टी पीन. प्रत्येकीच्या पर्समध्ये एखादी तरी सेफ्टी पीन दिसून येतेच. मात्र आता या सेफ्टी पीनचे विविध प्रकारही समोर येत आहेत. साडय़ांसाठी तर वेगवेगळ्या नजाकतीच्या पिन्स आपण पाहिल्याच असतील, मात्र आता ब्रेसलेट, चैन यांसारख्या अलंकारांसाठीही या पिन्सचा वापर होताना दिसत आहे.
मात्र या पिनांचा वापर कसा केला आहे, यावर ते कशासाठी वापरता येईल हे ठरणार आहे. आजकाल अनेक टॉप्स, वन्स पिस, गाऊन यांना साखळी लावलेली असते किंवा चैनस्वरूपात एखादा पट्टा कंबरेभोवती असतो. हे पट्टे एकमेकांना जोडण्याकरताही अशा सेफ्टी पिनांचा वापर होताना दिसत आहे.
त्याचबरोबर काही ठिकाणी अशा पिन्स एकत्र करून त्याला गळ्यातील हारांचा आकार दिला गेला. केवळ हारच नव्हे तर ब्रेसलेट, कानातले, घडय़ाळ, अंगठी तयार केले जातात. मात्र असे दागिने वापरताना तुम्हाला काळजीही घ्यावी लागेल.