मिरवणुकीतील गाण्यांत परशा-आर्ची अन् ‘बाई वाडय़ावर या’!

गणरायाला निरोप देणाऱ्या ‘तरुणाई’ने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ आणि स्पीकरच्या भिंतींपुढे ‘झिंगाट’नाच करताना मोक्याच्या क्षणी दाखल झालेल्या गाण्यांना उचलून धरले. ‘मी तुझा परशा’, ‘तू माझी आर्ची’, ‘सुया घे, पोत घे’ अन् ‘बाई वाडय़ावर या’ आदी गाण्यांचा ठेका राज्यभरात उत्सवकाळ दणदणून सोडत होता.

विसर्जन मिरवणुकांमध्ये उडत्या चालीच्या गाण्यांवर बेफाम होऊन नाचणारा एक वर्ग असतो. विशिष्ट अशा गाण्यांवर नाचण्याची त्यांची आग्रही मागणी असते. दरवर्षी अशा ‘फर्माईशी’ गाण्यांनी धमाल उडवून दिलेली आहे. यंदा ‘परशा’-‘आर्ची’च्या गावरान ‘लव्ह स्टोरी’तील ‘याड लागलं’ पासून ‘िझगाट’पर्यंतची सगळी गाणी हीट झाली. आता त्यांच्यावर आधारित गजानन पाचेगावकरांचे ‘मी तुझा परशा, तू माझी आर्ची’ हे धम्माल गाणे आले आणि अपेक्षेप्रमाणे त्याने उत्सवात कल्ला केला. पाचेगावकरांचेच ‘अरे आपला भाऊ’ हे गाणे येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मंडळातील इच्छुक उमेदवारांना भाव खाण्याची संधी देऊन गेले. ‘मी कोल्हापूरची झिंगाट..’ अशी स्थान माहात्म्य सांगणारी गाणीही होती. याखेरीज, ‘शांताबाई’, ‘रिक्षावाला’, ‘पारू’, ‘आवाज वाढव तुझ्या..’, चिमणी उडाली भुर्र्र’, ‘बानू बया’, ‘तुझ्या रूपात चांदणं पडलया’, ‘जीव झाला येडापीसा’, ‘मैं हूँ डॉन’, ‘आ देखे जरा’, ‘नायक नही खलनायक हू मै’, ‘सपने मे मिलती है’, ‘राम जी की निकली सवारी’, ‘बिलनची नागीन निघाली’, ‘बाबुराव बोलतोय’, ‘कसं बुगु बुगु वाजतय.’, ‘दाजीबा’, ‘डोकं फिरलया’, ‘कोंबडी’, ‘मुंगडा’, अशा गाण्यांची ‘गणपती डान्सर्स’ मध्ये मागणी होतीच.

गणपती गाण्यांची बाजारपेठ

दरवर्षी चित्रपटांमधून गाजलेली आणि श्रोत्यांच्या ओठांवर खेळणारी गाणी मिरवणुकांमध्ये गाजतातच. मात्र त्याचबरोबर संगीत अल्बमची निर्मिती करणाऱ्या काही कंपन्या या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी मुद्दाम काही गाणी बाजारात आणतात. या वर्षीही साधारण ३० ते ४० नवी गाणी विविध कंपन्यांनी गणेशोत्सवापूर्वी आणली होती.

झिंगाटलेली गाणी

यंदा अजय-अतुलच्या ‘सैराट’फेम ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याने पहिल्या दिवसापासून सगळीकडे धुमाकूळ घातला. विसर्जन मिरवणुकीतही ‘झिंगाट’ आघाडीवर होते. मात्र, उत्सवाच्या मोक्यावर आलेल्या काही गाण्यांनी भाव खाल्ला . प्रदीप कांबळे यांचे ‘सुया घे, पोत घे’, राहुल बळवंत, साजन बेंद्रे यांचे ‘पोरगं माझं गुनाचं,  वाजव ढागळांग, त्याचप्रमाणे, ‘बाई वाडय़ावर या’, अशा गाण्यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *