‘गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकरच या, अशा जयघोषात मुंबईकरांनी दीड दिवसांच्या बाप्पांना मंगळवारी निरोप दिला. सायंकाळपर्यंत अनेक घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जुहू, दादर, वर्सोवा व गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, शीतल तलाव (कुर्ला), पवई तलाव येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी बारा वाजल्यापासून सामूहिक आरत्या सुरू होत्या.
बाप्पांचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी मुंबईत पाच हजार पोलिसांचे पथक ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले होते. गिरगाव चौपाटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विविध ठिकाणी ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच दिवसांचे व दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.
विशेष उपाययोजना
विविध चौपाटय़ांवर महापालिकेचे अधिकारी, बोटी, आरोग्य केंद्र, लाईट व कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. किनारपट्टय़ांवर गर्दी होऊ नये, कचरा इतरत्र टाकू नये, यासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी ठेवली होती.
