तुर्कीतील बॉम्बस्फोटात ११ पोलीस अधिका-यांचा मृत्यू

तुर्कीत शुक्रवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात ११ पोलीस अधिका-यांचा मृत्यू झाला तर ७० जण जखमी झाले. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

दक्षिण पूर्व तुर्कीतील सीझरे येथील पोलीस मुख्यालयाजवळ हा हल्ला करण्यात आला. हे गाव सीरिया आणि इराकच्या सीमेवर वसले आहे. हल्लेखोरांचे लक्ष्य पोलीस ठाण्यालगत असलेले चेक पॉइंट होते, असे अनाडोलू या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच पीकेकेने पोलीस आणि सैन्य दलाच्या गाडीवर हल्ला केला होता. मागील वर्षी शांतता चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर येथील हिंसाचाराला सुरुवात झाली होती.

तुर्कीचे आरोग्यमंत्री रेसेप अकदाग यांनी चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. सीरियातील कुर्दिश बंडखो-यांच्या तळांवर सीरियन सैन्यांनी हल्ला केल्यानंतर काही वेळातच स्फोट झाला.

मुख्यालयाची इमारत या स्फोटात पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. तुर्कीने म्हटले आहे की, शेजारच्या सीरियामध्ये आमचे युद्ध इसिस दहशतवाद्यांबरोबर कुर्दिश बंडखो-यांच्या विरोधातही आहे. तुर्कीने शुक्रवारी आणखी चार रणगाडे सीरियन सीमेवर पाठवल्याचे एएफपी वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *