भारत-अमेरिका यांच्यात महत्त्वाचा संरक्षण करार

भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करणारा करार मंगळवारी दोन्ही देशांत झाला. दोन्ही देशांत झालेल्या संरक्षणविषयक लॉजिस्टिक कराराअंतर्गत परस्परांच्या लष्करांना एकमेकांची सामग्री, विमानतळ, दुरुस्ती देखभाल, पुरवठा आदींचा वापर करता येणार आहे.

भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी ‘लॉजिस्टिक्स एक्स्चेंज मेमोरंडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट्स’ वर स्वाक्ष-या केल्या. या करारानंतर संयुक्त निवेदन जाहीर केले.

या कराराअंतर्गत संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार सहकार्याच्या संधी निर्माण करण्याचे ठरवले आहे. अमेरिका आपले प्रगत संरक्षण तंत्रज्ञान भारताला उपलब्ध करून देईल. मात्र, भारतात अमेरिकेचा कोणताही तळ उभारला जाणार नाही, असे संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी स्पष्ट केले.पर्रिकर म्हणाले की, दोन्ही देशाचे नौदले संयुक्तपणे सरावासह विविध ऑपरेशन्समध्ये सहभागी होतील.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर म्हणाले की, या करारामुळे दोन्ही देशांची संरक्षण दले अधिक कार्यतत्पर बनतील. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे. यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *