रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत कांस्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिकचे लवकरच शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. साक्षीने एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाची माहिती दिली. यंदाच्या वर्षात आपण लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे साक्षीने जाहीर केले आहे. पण यासोबतच लग्नामुळे आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही, असेही साक्षीने सांगितले आहे. माझा पती मला माझ्या करिअरमध्ये साथ देईल याचा मला विश्वास आहे. तो माझी स्वप्न ही त्याची स्वत:ची समजतो. त्यामुळे तो माझ्या आयुष्यात पतीसोबतच माझ्या मित्राची भूमिका पार पाडेल. आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीमध्ये तो देखील आपल्याला मदत करेल, असेही साक्षी पुढे म्हणाली. साक्षीने अद्याप आपल्या पतीने नाव उघड केले नसले, तरी यंदाच्या वर्षात विवाहबद्ध होणार असल्याची शक्यता तिने वर्तवली आहे.