मंगळवारपासून पाणीपट्टीत आठ टक्के वाढ

मंगळवारपासून पाणीपट्टीत आठ टक्के वाढ

निवडणुकांमुळे गेल्या वर्षी टळलेली पाणीपट्टी दरवाढ या वेळी मुंबईकरांना दामदुपटीने सहन करावी लागणार आहे. मंगळवारपासून पाणीपट्टीत आठ टक्के वाढ होत असून या आर्थिक वर्षांत पाणीपट्टीच्या तुलनेत मलनि:सारण आकार ६० वरून ७० टक्के केला गेल्याने अप्रत्यक्ष दरवाढ १४ टक्क्यांवर जाणार आहे.
शहराला दररोज सुमारे ३७०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागत असून त्यासाठी दरवर्षी प्रशासकीय,mu03 वीज आणि दुरुस्ती व देखभाल खर्च वाढत जातो. त्यामुळे जून २०१२ मध्ये पालिकेने दरवर्षी पाणीपट्टीत आठ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०१३ मध्ये आठ टक्के वाढ करण्यात आली. मात्र २०१४ मध्ये लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्याने ही वाढ टळली. या वर्षी मंगळवारपासून सध्या लागू असलेल्या पाणीपट्टीच्या दरात आठ टक्के वाढ केली जाणार आहे. त्यामुळे इमारती, चाळी यांमधील हजार लिटरमागील पाण्याचे दर ४.३२ रुपयांवरून ४.६६ रुपयांवर जाणार आहेत. झोपडपट्टी, व्यावसायिक संस्था, कारखाने, हॉटेल या सर्वाच्याच पाणीपट्टीत सरसकट आठ टक्के वाढ होणार आहे. मात्र ही वाढ केवळ एवढय़ापुरती मर्यादित नाही. मुंबईकरांना पाणीपट्टीच्या तुलनेत ६० टक्के मलनि:सारण आकार द्यावा लागत होता. या आर्थिक वर्षांत तो ७० टक्के करण्यात आला आहे. पाणीपट्टी वाढल्यास मलनि:सारण आकारही जादा भरावा लागणार आहे. त्यामुळे मार्चच्या तुलनेत ग्राहकांना १४ टक्के जादा पैसे भरावे लागतील. १६ जून २०१२ रोजी पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार पाणीपट्टीत दरवर्षी आठ टक्के वाढ केली जाते. गेल्या वर्षी ही वाढ झाली नव्हती. मात्र २०१३ च्या दरांवर आठ टक्के वाढ होत असून निवासी, व्यापारी, हॉटेल अशा सर्वच ग्राहकांसाठी ही वाढ लागू होईल, असे जलविभागाचे उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *