रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची आज (सोमवार) हैदराबादमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. गच्छिबावली स्टेडियममध्ये या दोघांचा तेलंगणा सरकारकडून सत्कार करण्यात येणार आहे.
बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी सांगितलेले की, आज सकाळी नऊ वाजता सिंधू आणि गोपीचंद यांचे हैदराबादमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची बेस्टच्या निलांबरी बसमधून मिरवणूक काढण्यात येणार होती. तेलंगणा सरकारने केलेल्या मागणीनुसार आम्ही डबल डेकर बस पाठविली होती.
फुलांनी सजविलेल्या बसमधून या दोघांची मिरवणूक काढण्यात आली. या दोघांच्याही हातात तिरंगा झेंडा देण्यात आला होता. गच्छिबावली स्टेडियमपर्यंत यांची मिरवणूक नेण्यात आली. त्याठिकाणी तेलंगणा सरकारकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. बसवर या दोघांची पोस्टर्स लावण्यात आली होती. सिंधू आणि गोपीचंद यांच्या मिरवणुकीला मोठा प्रतिसाद मिळाला.
