नरसिंगवर चार वर्षाची बंदी

भारताचा युवा कुस्तीपटू नरसिंग यादवला उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी आरोप सिद्ध न करता आल्याने ऑलिंपिकमध्ये खेळण्यापासून रोखतानाच चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. नरसिंगसह भारतासाठी ही धक्कादायक बाब ठरली आहे.

राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या चाचणीत नरसिंगच्या रक्तात प्रतिबंधित मॅथँडिएनॉन पदार्थाचे अंश आढळले होते. ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने त्याला निर्दोष ठरवले. मात्र जागतिक डोपिंगविरोधी संघटनेने (वाडा) राष्ट्रीय संस्थेच्या निर्णयाविरोधात ब्राझीलमधील क्रीडा लवादाकडे दाद मागितली. निर्दोषत्व सिद्ध करण्यास नकार दिल्याने क्रीडा लवादाने ‘वाडा’चे अपील उचलून धरले. त्यानंतर नरसिंगला ऑलिंपिकमध्ये सहभागापासून रोखण्यासह चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्याला ४८ तासांमध्ये ऑलिंपिक क्रीडा ग्राम सोडण्यास सांगितले आहे.

नरसिंगवर बंदी घातल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. प्रथमच ऑलिंपिकमध्ये सहभागी झाला तरी त्याच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र डोपिंगमुळे प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करण्यापूर्वीच नरसिंगला माघारी परतावे लागत आहे. नरसिंग हा फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात ७४ किलो वजनी गटात सहभागी होणार होता.

पदक मिळवण्याचे माझे स्वप्न निर्दयीपणे हिसकावून घेतले – नरसिंग

रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक मिळवण्याचे माझे स्वप्न होते. मात्र पदक मिळवण्याचे माझे स्वप्न निर्दयीपणे हिसकावून घेण्यात आले आहे, असे नरसिंगने म्हटले.

‘‘बंदीच्या निर्णयाने मी निराश झालोय. दु:खी झालोय. मात्र आत्मविश्वास गमावलेला नाही. गेल्या दोन महिन्यांतील घडामोडीने मला खूप काही शिकवले आहे. मी निर्दोष आहे. तसे सिद्ध करेन. तसेच २०२० टोक्यो ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन भारताला पदक मिळवून देईन,’’ असा विश्वास नरसिंगने व्यक्त केला.

आपल्याच लोकांनी नरसिंगचा घात केला – राजीव मेहता

क्रीडा लवादामुळे नव्हे तर आपल्याच लोकांनी नरसिंगचा घात केल्याचे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (आयओए) महासचिव राजीव मेहता यांनी म्हटले आहे. दरम्यान, कायम नरसिंगच्या मागे राहू, असे भारतीय कुस्ती महासंघाने स्पष्ट केले आहे.

‘‘क्रीडा लवादाची कारवाई ही पुराव्यांच्या आधारे आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. नरसिंग ऑलिंपिकमध्ये खेळू नये, असे अनेकांना वाटत होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला. आम्ही नरसिंगला निर्दोष ठरवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, आम्हाला त्यात यश आले नाही. नरसिंग हरला आणि त्याचे विरोधक जिंकले,’’ असे मेहता म्हणाले.

क्रीडा लवादासमोरील नरसिंगच्या सुनावणीदरम्यान मेहता यांनी आयओएचे प्रतिनिधित्व केले.

आईवडील निराश

आपल्या मुलाला ऑलिंपिकमध्ये सहभागी होता आले नाही. तसेच चार वर्षाची बंदी घातली गेल्याने नरसिंगचे आईवडीलही निराश झाले आहेत. ‘‘माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला गोवण्यात आले आहे. तो कटाचा बळी ठरला. या क्षणी त्याला सर्वाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे,’’अशी विनंती नरसिंगची आई भुलना देवी हिने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *