कर्करोग पिडीत मुलांपैकी ७० टक्के मुले कुपोषित

देशात दरवर्षी ५० हजार मुलांना कर्करोग होत आहे. यातील केवळ दहा हजार मुले उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. कर्करोगाच्या उपचारात औषध व केमोथेरपी द्यावी लागत असल्याने या मुलांच्या आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. पण मुलाच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना पौष्टिक आहारही मिळत नाही. त्यामुळे कर्करोगग्रस्त ७० टक्के मुले कुपोषणाचा शिकार होत असल्याची माहिती टाटा रुग्णालयातील बालकर्करोगतज्ज्ञ डॉ. ब्रीजेश अरोरा यांनी दिली.

बाल कर्करोगग्रस्तांमध्ये पौष्टिक आहाराच्या अभावामुळे वाढत्या कुपोषणाबाबत माहिती देण्यासाठी परळ येथील टाटा मेमोरिअल रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बाल कर्करोग रुग्णांच्या आहारावर विशेष लक्ष देण्यासाठी टाटा रुग्णालय अग्रेसर आहे. याच धर्तीवर आता ‘कड्स’ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्था ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पोसिबिल्टी’(सीआरएस)च्या सहाय्याने देशातील नऊ शहरांपैकी १७ रुग्णालयांत कर्करोगाने त्रस्त असलेल्या लहान मुलांना आहार पुरवला जाणार आहे. मुंबई, दिल्ली, बंगळूरू, कोलकाता, हैदराबाद, जयपूर, छत्तीसगड आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. याकरता २४ आहारतज्ज्ञ असतील.

कर्करोगग्रस्त मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘मिडे मिल्क’ व ‘रेशन बास्केट’ या योजना राबवल्या जात आहेत.

‘मिड डे मिल्क’ मध्ये सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाणार आहे. तसेच मुलांवरील उपचार पूर्ण होईपर्यंत ‘रेशन बास्केट’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक रुग्णालयातील १०० कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे. यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, पीठ व डाळ पुरवण्यात येईल. हे खाल्ल्याने रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. कर्करोगावरील उपचाराचा खर्च प्रचंड असल्याने मुलांचा पालकांना तो परवडण्याजोगा नसतो. अशावेळी पोषक आहारासाठी

त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे कमी पैशात उपलब्ध होईल असे ‘लस्सी व बटर’ ही मुलांना दिले जाणार आहे, असे ‘कड्स’ फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुनोता बहल यांनी सांगितले. तसेच मुलांची काळजी कशी घ्यावी याकरता मातांचे विशेष मागदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *