रिओ ऑलिंपिकमधील गुरुवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. कुस्तीपटू साक्षी मलिकने महिलांच्या कुस्तीमध्ये फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक मिळवले. त्यानंतर पी. व्ही. सिंधूने महिला बॅडमिंटन एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना भारताचे आणखी एक पदक निश्चित केले.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गुरुवारी नवव्या सीडेड पी. व्ही. सिंधूने कमालीचे सातत्य राखताना सहाव्या सीडेड जपानच्या नोझोमो ओकुहारावर २१-१८, २१-१० असा सहज विजय मिळवला. सिंधूपेक्षा वरचे सीडिंग असूनही ओकुहाराने सपशेल हार पत्करली.
साक्षीने आणले कांस्यपदक »
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारी २१ वर्षीय सिंधू भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे. ‘फायनल’मध्ये पोहोचल्याने सिंधूचे सुवर्ण किंवा रौप्यपदक निश्चित झाले आहे.
अंतिम फेरीत शुक्रवारी सिंधूसमोर अव्वल सीडेड स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनचे आव्हान आहे. प्रतिस्पर्धी अव्वल सीडेड असला तरी सिंधूने ‘फायनल’पर्यंत एकही गेम गमावलेला नाही. त्यामुळे सिंधूला सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.