पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायनीज प्रकाराच्या मांजामुळे पक्षांसह माणसांनाही मोठी हानी पोचत असल्याने दिल्ली सरकारने अशा प्रकारच्या मांज्यावर संपूर्ण बंदी लागू केली आहे.
अलिकडे जीवघेण्या चायनीज मांज्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार अशा मांजावर बंदीच्या विचारात होती. अखेर दिल्ली सरकारने एका सूचनेद्वारे पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार दोऱ्यांवर (मांजा) संपूर्ण प्रकारची लागू केली आहे. नायलॉन, प्लॅस्टिक आणि चायनीज मांज्याची विक्री, उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर यावर संपूर्ण बंदी असल्याचे सूचनेत म्हटले आहे. तसेच पतंग उडविण्यासाठी कॉटनचा, काचेची किंवा धातूचा समावेश नसलेला दोरा वापरण्यास परवानगी असल्याचेही सूचनेत म्हटले आहे. अलिकडेच पश्चिम दिल्लीत दुचाकीवरून जात असलेल्या एका 28 वर्षांच्या तरुणाचा मांज्यामुळे गळा कापला गेला होता. त्यानंतर दिल्ली सरकार अशा प्रकारच्या बंदीबाबत विचार करत होते.
मांजा म्हणजे काय?
पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार दोऱ्याला मांजा म्हणतात. अशा प्रकारचा मांजा भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये वापरण्यात येतो. साध्या कॉटनच्या किंवा इतर प्रकारच्या दोऱ्याला काचेच्या पावडरचे आवरण चढवून मांजा तयार करण्यात येतो. ब्राझीलमध्ये अशा प्रकारच्या दोऱ्याला “सेरॉल‘ म्हणतात. ज्यावेळी पतंग आकाशात उंच असतो. त्यावेळी आकाशात आजूबाजूला असलेल्या इतर पतंगांना कापण्यासाठी मांजाचा उपयोग होतो. म्हणून साधारणपणे मांजाचा वापर पतंगाच्या समोरच्या भागात करण्यात येतो.
मांज्यामुळे अलिकडे झालेले काही अपघात
- जयपूरमध्ये 2014 साली संक्रातीनिमित्ता उडविण्यात येत असलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे एका मुलीचा मृत्यु झाला होता. शिवाय याच घटनेत इतर 73 जण जखमी झाले होते.
- मागील तीन दिवसांपासून राजधानी दिल्लीत चायनीज मांज्यामुळे 500 पेक्षा अधिक पक्षी जखमी झाले होते.
- चेन्नईमध्ये मांज्याच्या अपघातामुळे 2013 ते 2015 दरम्यान चार जणांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी पुढील 60 दिवसांसाठी मांज्यावर बंदी आणली होती.
चायनीज मांज्याचे आकर्षण
कॉटनच्या दोरीपेक्षा चायनीजचा मांजा स्वस्त असल्याने तो खरेदी करण्याकडे लोक आकर्षित झाले होते. शिवाय चायनीज मांजा हा कॉटन मांज्यापेक्षा 500-700 रुपयांची स्वस्त असल्यानेही मागणी वाढत होती.