स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी युनियनचा आज बंद

स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी युनियनचा आज बंद

मुंबईत खासगी कंपन्यांच्या टॅक्सी सेवेमार्फत सुरू असलेल्या अनधिकृत प्रवासी वाहतुकीला लगाम घालण्याकरिता आणि डॉ. हकीम समिती रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी युनियनने आज बेमुदत संप पुकारला आहे.

मुंबई आणि उपनगरातील सुमारे २० हजार रिक्षा-टॅक्सी या संपात सामील होणार आहेत. ओला, उबेर, मेरु प्लस, जिनी कॅब या कंपनीच्या वाहनांना केवळ पर्यटन परवानगी असताना प्रवासी वाहतूक करणा-या या कंपन्यांकडून किलोमीटरच्या दरांत भाडे वसूल करण्यात येत असते.

या बेकायदा वाहतुकीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत असल्याचे युनियनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई शहरात मीटरच्या दरावर वाहन चालविण्याचा परवाना केवळ रिक्षा आणि टॅक्सीला आहे. मात्र अनेक खासगी टॅक्सी कंपन्या वाहतूक नियमांच उल्लंघन करून मुंबईत व्यवसाय करीत आहेत.

यामुळे सर्वसामान्य रिक्षा-टॅक्सीचालकांच्या व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. अनेकदा परिवहन विभागातील संबधितांच्या ही बाब निदर्शनास आणून देखील यावर तोडगा निघत नसल्याने स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी युनियनने संपाचा निर्णय घेत असल्याचे परिवहन आयुक्तांना दिलेल्या पत्रात युनियनने म्हटले आहे.

याशिवाय हकीम समिती रद्द करीत असताना सरकारने रिक्षा-टॅक्सी संघटनांना विश्वासात न घेतल्याची नाराजी देखील युनियनने व्यक्त केली आहे. रद्द करण्यापूर्वी समितीच्या त्रुटी निदर्शनास आणून द्यायला हव्या होत्या. चर्चा करून यावर निर्णय घेता आला असता मात्र सरकारने तसे न करता केवळ मंत्रालयातून निर्णय घेतल्याने हकीम कमिटी रद्द करू नये अशी मागणी संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *