नंदुरबारमधील नवापूरमधील रंगावली नदीला आलेल्या पुरात बस वाहून जाताना थोडक्यात वाचली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे रंगारी नदीला आलेल्या पुरात एसटी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. दरम्यान संबंधित घटनेची चाहूल लागताच स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एसटीमधील १७ प्रवाशांचा जीव वाचला. बसमधील सर्व १७ प्रवाशांना जेसीबीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले. नंदुरबार – नवापूर परिसर आणि गुजरात राज्यातील आहवा डांगच्या जंगलात जोरदार पाऊस झाल्याने रंगावली आणि हंगावली या नद्यांना पूर आला आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात रंगावली नदीला पूर आला आहे. काही दिवसांपूर्वी महाड आणि पोलादपूर यांना जोडणारा ब्रिटिशकालिन पूल वाहून गेल्याने राज्यात दोन एसटी बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत जवळपास २४ जणांनी आपले प्राण गमावले होते. सावित्री नदीच्या पुरात वाहून गेलेल्या वाहनांचा अजूनही शोध लागलेला नाही.
