ठाण्यातील प्रसिद्ध विवियाना मॉलमधील महिलांच्या टॉयलेटमध्ये चोरुन मोबाईल चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेसोबत रविवारी हा प्रकार घडला.
35 वर्षीय महिला पतीसोबत रविवारी विवियाना मॉलमध्ये गेली होती. ही महिला रात्री 12 च्या सुमारास मॉलमधील स्वच्छतागृहात गेली. स्वच्छतागृहाला लागूनच असलेल्या बाजूच्या खोलीतून एक व्यक्ती मोबाईलवरुन शूटिंग करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. तिने तातडीने बाहेर येऊन याबाबत पतीला माहिती दिली. त्यानंतर पतीनेही शूटिंग करत असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेच्या पतीला धक्का देत तो व्यक्ती तिथून पसार झाला.
या संदर्भात वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस विवियाना मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासत आहेत.
काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांना गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरुममध्ये छुप्या कॅमेऱ्याद्वारे शूटिंगचा अनुभव आला होतो. मात्र आता ठाण्यातील प्रकारानंतर मुंबईतील सर्व मॉलची तपासणी करण्यात आली होती.

