इकडे गेले त्यांचे जीव, इकडे यांचे नौकानयन

सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार भरत गोगावले हे शनिवारी सावित्री नदीत नौकानयन करण्यात मग्न होते.

शोध पथकाला होडय़ा देण्यासाठी स्वत:साठी खास होडी आणून शिंदे व गोगावले यांनी ‘पाहणी’च्या नावाखाली हसत हसत, सेल्फी काढत नौकानयनाची हौस पूर्ण केली. या कामात त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीलाही सोबत घेतले.

नामदार आणि आमदारांच्या या ‘चमको’गिरीची खिल्ली महाडमध्ये उडवली जात आहे. दरम्यान, या पुल दुर्घटनेला चार दिवस पूर्ण होऊनही शोध पथकांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी सेल्फी काढला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:साठी स्वतंत्र होडी घेऊन सावित्री नदी पात्रात नौकानयन केले. शेडावनाका परिसरात क्रेनच्या सहाय्याने होडी नदीपात्रात उतरवुन ते पाण्यात उतरले. ना. शिंदे आणि यांच्यासोबत महाडचे आमदार भरत गोगावलेही सोबत होते. होडी पाण्यात गेल्यानंतर गोगावले यांनी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला आणि कॅमेरामनला सोबत घेतले.

मदत करण्यासाठी ना. शिंदे हे महाडला आले होते तर त्यांनी आपली होडी मदत कार्यासाठी देणे गरजेचे होते. या होडीला पाण्यात चालणारा कॅमेरा बसवला होता. तर मग त्याचे तंत्रज्ञही होडीत जाणे गरजेचे होते. पण केवळ एक तंत्रज्ञ आणि होडी चालक सोबत घेऊन आणि दुस-या होडीत वाहिनीचा प्रतिनिधी घेऊन नदी पात्रात गेले. मंत्री आणि आमदारांना नदीत उतरण्याची गरज काय? शासन कमी पडते का? या प्रश्नांमुळे ही मदत नव्हेतर चमकोगिरी होती, अशी चर्चा सुरू आहे.

सावित्री नदी पूल दुर्घटनेत नक्की किती वाहने वाहून गेली. या वाहनांत किती प्रवासी होते याची माहिती नाही. एस.टी. महामंडळाने १८ प्रवासी आणि चार कर्मचारी वाहुन गेल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. तवेरा गाडीमध्ये ९ प्रवासी वाहुन गेल्याचे जाहीर करण्यात आले होते. आजही बेपत्ता प्रवाशांची माहिती गोळा करण्याचे काम नियंत्रण कक्षात सुरू आहे. तर शोध पथक आणि नदी किनारच्या ग्रामस्थांमार्फत मृतदेह आणि वाहनांचा शोध सुरू आहे.

शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत २३ मृतदेह सापडले तर शनिवारी सकाळी म्हाप्रळ येथे दिनेश कांबळे या तवेरातील प्रवाशाचा मृतदेह सापडला. तर बाणकोट येथे एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटलेली नाही. या व्यतिरिक्त शोधकार्यात प्रगती झालेली नाही.

ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हाताळण्याचे काम, त्यांची व्यवस्था हे कनिष्ठ अधिका-यांच्या अंगावर टाकुन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम हे सर्व अधिकारी एकाच ठिकाणी दुर्घटनास्थळाजवळ मदत केंद्रात ठाण मांडुन बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *