उत्तर प्रदेश राज्यातील देवबंद येथील एका देवळामधील मूर्तीची विटंबना करण्यात आल्याने येथे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त आज सूत्रांनी दिले.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकास अटक केली आहे. आरोपीने मंदिरामधील मूर्तीवर हातोड्याने घाव घातल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीवर आता राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आरोपीचे नाव सादिक असे असून तो 21 वर्षांचा असल्याची माहिती येथील वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक प्रदीप कुमार यांनी दिली.
“या घटनेनंतर जातीय हिंसाचार न होऊ देण्याची खबरदारी घेण्यासाठी काही पथके तैनात करण्यात आली असून येथील सुरक्षाव्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. सध्या “कंवरिया यात्रे‘चे दिवस असल्याने मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे जातीय हिंसाचार पेटण्याची शक्यता होती,‘‘ असे कुमार म्हणाले. मूर्तीवर घाव घालणाऱ्या सादिक याला त्याच्या शेजाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.