बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात अडकलेल्या माजी संचालकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले असून अटकेच्या भीतीपोटी संचालक व या घोटाळ्यातील अनेक नेते फरार झाले आहेत. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, राज्यसभा खा. रजनीताई पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुभाष सारडा यांचा समावेश आहे.
बीड बँकेत झालेल्या 141 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 131 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 105 जणांच्या चौकशीचे आदेश विशेष पथकाला देण्यात आले होते. विशेष पथकाने 102 जणांची चौकशी केली. बीड बँकेत दोषी असलेल्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले असून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. रजनीताई पाटील, आ. अमरसिंह पंडित यांच्या घरावर अटक वॉरंटची नोटीस दाकवण्यात आली आहे. इतर संचालक अटकेच्या भीतीनेच फरार झाले आहेत. सोमवारी दिवसभर पोलिसांकडून अटकेची व्यूहरचना व वॉरंट बजावण्याचे काम चालू होते.
बहुचर्चित जिल्हा मध्यवर्ती घोटाळा प्रकरणात 93 जणांविरोधात सोमवारी बीड, अंबाजोगाई कोर्टात चार्जशीट दाखल केले जात असून एसआयटीने या 93 जणांना फरार म्हणून घोषित केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात असल्याने मातब्बरांवर अटकेची टांगती तलावर अद्यापही कायम आहे. आ. जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, बदामराव पंडित, स्व. बळवंतराव कदम, शोभा जगदीश काळे या पाचजणांना एसआयटीने क्लिनचीट दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आर्थिक गुन्हा अॅक्टनुसारची कारवाई या लोकांवरची टळल्याची सूत्रांचे म्हणणे आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एसआयटी स्थापन करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर एसआयटीने या प्रकरणातील 105 जणांची कसून चौकशी केली त्यानंतर यातील दोषींना अटक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. पोलिसांनी अनेक मातब्बरांवर लक्ष देऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती कोणी लागले का नाही, हे कळू शकले नाही. दुसरीकडे एसआयटी आणि बीड पोलिस 14 गुन्ह्यांमध्ये 93 जणांविरोधात बीड, अंबाजोगाई न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीत असून संबंधित अधिकारी न्यायालयामध्ये हजर असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी एसआयटी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर याबाबत माहिती दिली जाईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले.
93 जणांमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, राज्यसभा खा. रजनीताई पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुभाष सारडा यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हा अॅक्टनुसार दोषींवर कारवाई केली जाईल असे बोलले जात होते परंतु संबंधित लोकांवर आर्थिक गुन्हा अॅक्टनुसारची कारवाई टळल्याचेही बोलले जात आहे. 93 जणांविरोधचे चार्जशीट आज दाखल होत असून या सर्व लोकांना फरार घोषित केले जाणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, राज्यसभा खा. रजनीताई पाटील यांच्यासह राजकारणातील अन्य मातब्बर फरार म्हणून घोषित केले जाणार असल्यामुळे बीड जिल्ह्यातल्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.