सेक्स रॅकेट प्रकरणावरून भाजपा-शिवसेनेत राडा

उल्हासनगरमधील सेक्स रॅकेट प्रकरणातील आरोपी शोभा गमलाडू हिचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असणारे फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्यावर शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करत केडीएमसीचे भाजपा परिवहन सदस्य सुभाष म्हस्के यांच्या तोंडाला शिवसनिकांनी शाई फासून त्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी कल्याण पूर्वेत घडली. आपल्या घरी पायी जात असताना शिवसनिकांनी हा हल्ला केला असल्याचे केडीएमसीचे भाजपा परिवहन सदस्य सुभाष म्हस्के यांनी माध्यमांना सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याची अथवा शिवसेना पक्षाची बदनामी केली नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘याबाबत पोलिसात तक्रार केल्यास हात-पाय तोडून जीवे ठार मारू’ अशी धमकी दिल्याचे देखील म्हस्के यांनी स्पष्ट केले. या प्रकारांमुळे मात्र भाजपा आणि शिवसेनेच्या राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागत आहे.

दोन दिवसा पूर्वी उल्हासनगरमधील शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या गमलाडू हिला सेक्स रॅकेट प्रकरणी ठाणे समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला शिवसेनेची कार्यकर्ती असल्यामुळे तिचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याबरोबर असलेले फोटो फेसबुक आणि सोशल मीडियावरुन व्हायरल करून पालकमंत्री आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांची बदनामी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली असल्याचा आरोप शिवसनिक करीत आहेत. याच माध्यमातून कल्याण पूर्वेतील भाजपाचे परिवहन सदस्य सुभाष म्हस्के यांनीच यांच्या फेसबुक पेजवरून हे फोटो व्हायरल केल्यामुळे रविवारी दुपारी शिवसनिकांनी म्हस्के यांना रस्त्यात गाठून त्यांना मारहाण करून त्यांच्या तोंडावर शाई फेकून निषेध केला.

तसेच यापुढे आपल्या नेत्याचा अशा प्रकारे बदनामी केल्यास भाजपाच्या नेत्यांच्याही तोंडाला शाई फासण्याचा इशारा शिवसनिकांनी दिला आहे. दरम्यान आपल्यावर शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत तोंडाला शाई फासल्याचा आरोप म्हस्के यांनी केला असून आपण अशा प्रकारचे कोणतेही फोटो व्हायरल केलेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर या संदर्भात गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांची बदनामी केल्यामुळेच म्हस्के यांना आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगत जर हे प्रकार ताबडतोब थांबले नाही तर पुन्हा हात उचलणार असल्याचा इशारा दिला आहे.

सेक्स रॅकेट चालविणा-यांवर कडक कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

कल्याण – ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयासमोरच देहविक्री व्यवसाय चालवणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी केली आहे. याबाबत त्यांनी स्थानिक महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना व जिल्हाध्यक्षांना आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे सेक्स रॅकेट चालवणा-या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांना निवदेन देऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *