मोबाइलसाठी मुलाकडून शेजारच्या महिलेची हत्या

नवीन मोबाइलच्या हव्यासापोटी अल्पवयीन मुलाने शेजारच्या महिलेची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची घटना शनिवारी नालासोपाऱ्यात घडली. नालासोपारा पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक केली. नालासोपारा पश्चिमेच्या निळेगावात डीडी कॉम्प्लेक्समध्ये अनिल डोलाई हे पत्नी तनुश्री, दहा महिन्यांचा मुलगा आणि भावासोबत राहतात. शनिवारी रात्री अनिल आणि त्यांचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री साडेनऊ वाजता घरी परतल्यावर तनुश्री रक्ताच्या थारोळ्यात आढळली. चाकूने गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. मृतदेहाशेजारी तिचे दहा महिन्यांचे बाळ रडत होते. हे दृश्य पाहून सारेच हेलावले. या प्रकरणी पोलिसांनी याच इमारतीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाला अटक केली. या अल्पवयीन आरोपीला नवीन मोबाइल घ्यायचा होता. त्यासाठी तनुश्रीच्या घरात घुसून दागिने चोरण्याचा त्याचा प्रयत्न होता. तनुश्री शनिवारी रात्री घरात चपात्या बनवत असताना आरोपीने घरात घुसून लाटण्याने तिच्या डोक्यात प्रहार केला. तिने प्रतिकार करताच त्याने जवळच पडलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर वार करून हत्या केली. या घटनेनंतर घाबरलेला आरोपी आपल्या घरात स्नानगृहात जाऊन लपला होता. पोलिसांनी त्याला तासाभरातच अटक केली. त्याने मोबाइल घेण्यासाठी चोरी करण्याच्या उद्देशानेच ही हत्या केल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्याने चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याने हत्येपूर्वी तनुश्रीवर गुंगीसाठी स्प्रे मारल्याचाही संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *