‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वणी याच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे आज (सोमवार) सलग तिसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी आलेले सुमारे 15 हजार भाविक अडकून पडले आहेत.
काश्मीर खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 21 वर पोचली असून, 96 जवानांसह दोनशे लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचाराचा मोठा फटका अमरनाथ यात्रेला बसला असून, श्रीनगरमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे माघारी आणण्यात आले. यात्रेकरूंची नव्याने एकही तुकडी अमरनाथच्या दिशेने पाठविण्यात आलेली नाही, असे जम्मूचे पोलिस उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
आंदोलकांनी तीन पोलिस ठाण्यांना आग लावली असून, राज्य सरकारच्या मागणीनंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 20 तुकड्या खोऱ्यामध्ये पाठविण्यात आल्या आहेत. राज्यात आधीपासूनच “सीआरपीएफ‘च्या 60 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराच्या कारवाईमध्ये बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर दहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. काश्मीर खोऱ्याच्या बहुतांश भागातील रेल्वे सेवा शनिवारपासूनच ठप्प झाली आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.
