किशोर दर्डा यांच्या पोलीस कोठडीत वाढ

स्थानिक ‘यवतमाळ पब्लिक स्कूल’मधील विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेल्या संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

सोमवारी दर्डा यांना नागपूरमधून अटक करण्यात आल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांना यवतमाळ सत्र न्यायालयात उभे करण्यात आल्यानंतर आणखी दोन दिवस त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली.

बुधवारी या प्रकरणी नव्याने एक गुन्हा दाखल झाल्याने किशोर दर्डा यांच्या अडचणीत भर पडली आहे. अत्याचाराची माहिती असतानाही संबंधित यंत्रणेला न कळवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी बाल हक्क संरक्षण कायद्याच्या कलम-७५ अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. या दुस-या गुन्ह्यात त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली.

शाळेतल्या मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या या शाळेच्या दोन शिक्षकांवर गुन्हे दाखल असून; ते पोलीस कोठडीत आहेत. सचिव दर्डा यांच्या अटकेच्या मागणीसाठी यवतमाळमध्ये मोठे आंदोलन झाले होते. आता वातावरण बरेचसे निवळले असले तरी तणाव कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *