पंचगंगा स्मशानभूमीसाठी 50 लाख देणार – धनंजय महाडिक

‘पंचगंगा स्मशानभूमीला आलेली मरणकळा थांबवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करा. 50 लाखांचा निधी खासदार फंडातून दिला जाईल,‘‘ असे आश्‍वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. खासदार महाडिक यांनी याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे.

पारंपरिक दहनाबरोबरच डिझेल दाहिनी व इलेक्‍ट्रिक दाहिनीचेही पर्यायही नागरिकांना उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. हळूहळू त्याचाही वापर नागरिक करतील. आता असणारी जागा अपुरी पडत आहे. स्मशानभूमीत किमान दीडशे बेड असायला हवेत. अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जनावेळी मोठ्या संख्येने लोक येत असतात. त्यांच्यासाठी पार्किंग, स्वच्छतागृह, पाणी, बैठक व्यवस्था करायला हव्यात. त्यासाठी एक कोटी रुपयांचा लागला तरी हरकत नाही; पण शहराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सर्व सुविधांनी युक्त स्मशानभूमी बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी खासदार म्हणून मी 50 लाखांचा निधी देईन. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना विनंती करून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणासाठी उपलब्ध करून दिला जाईल. स्मशानभूमीत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.‘‘

महापालिकेचे दहा लाख
महापालिकेने पंचगंगा स्मशानभूमीच्या शेडसाठी दहा लाख रुपयांचा निधी पाच – दोन – दोन खाली मंजूर केला असून त्यातून शेडवरचे पत्रे बसविले जाणार आहेत. दोन दिवसांपासून नगरसेवक ईश्‍वर परमार यांनी यासाठी पाठपुरावा केला. महापौर अश्‍विनी रामाणे, मधुकर रामाणे यांनीही तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवक महेश सावंत यांनी स्वखर्चातून लोखंडी ग्रीलचे काम करू, असे सांगितले. भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आज स्मशानभूमीची पाहणी केली. सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, किरण नकाते, कमलाकर भोपळे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, एस. के. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *