वरुणराजाने गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे. रात्रभर मुसळधार कोसळणा-या पावसाचा धूमधडाका पहाटेही कायम राहिल्याने ठिकठिकाणी तुडुंब पाणी साचले होते. जोरदार वारे आणि पावसाची बॅटिंग यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईकरांची तारांबळ उडवली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने होत असतानाच रेल्वे सेवाही धीम्या गतीने चालू होती. परिणामी प्रत्येकाचीच त्रेधा उडाली होती.
गुरुवारपासून पावसाने सुरू केलेली जोरदार बॅटिंग शुक्रवारीही कायम होती. अधूनमधून विश्रांती घेत धो धो करत बरसणा-या पावसामुळे संपूर्ण मुंबई ओली चिंब झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने चालकांची, पादचा-यांची दाणादाण उडाली. पश्चिम उपनगरासह वांद्रे, दादर, परळ, वरळी आदी भागांत पावसाचा जोर दिसून आला. अंधेरी, जोगेश्वरी, पश्चिम द्रूतगती महामार्ग, जेव्हीएलआर रोड, वडाळा, चेंबूर नाका आदी भागांत वाहतूक धीम्या गतीने होत होती. सकाळी घरातून निघण्यापासून पुन्हा घरी जाईपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कुलाबा येथे ५.३० मिमी तर सांताक्रूझ येथे २०.३ मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि वा-याचा वेग कायम राहिल्याने कमाल तापमानाचा पारा घसरलेला होता.
कुलाबा येथे कमाल २९.८ अंश सेल्सिअस, किमान २५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे कमाल २९.३ अंश सेल्सिअस, किमान २३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येते २४ तास शहर परिसरात पावसाचा प्रभाव कायम राहणार असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
जूनमध्ये सरासरीपेक्षा किंचीत जास्त पाऊस
जून महिनाच्या दुस-या आठवडय़ापासून सुरू झालेला पावसाचा धुमाकूळ महिनाअखेपर्यंत कायम राहिली. पावसाचा जोर महिनाअखेर दिसून आल्याने यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा किंचीत जास्त पावसाची नोंद झाली असल्याचे ‘स्कायमेट’ या खासगी हवामान कंपनीतर्फे सांगण्यात आले. पावसाळ्यात दर महिन्यात सरासरी ५२३.१ मि.मी. पावसाची नोंद होत असून यंदा जून महिन्यात ६९५ मि.मी. पावसाची नोंद झाली.