चीनमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात लांबीच्या काचेच्या ब्रीजची चाचणी मंगळवारी करण्यात आली. चीनच्या मध्य भागातील हुनान प्रांतात हा काचेचा ब्रीज उभारण्यात आला आहे.
या ब्रीजवरील चाचणी दोन टन वजनाचा ट्रक चालवून घेण्यात आली. यशस्वी चाचणीनंतर हा ब्रीज पुढील महिन्यात वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे चीनच्या सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
चीनच्या हुनान प्रांतात उभारण्यात आलेला हा काचेचा ब्रीज ४३० मीटर लांब असून जमिनीपासून ३०० मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. चाचणीदरम्यान या ब्रीजवर २० स्वयंसेवकांकडून हातोडयाने घाव घालून काच फुटू शकते का याची परीक्षा करण्यात आली. तसेच ११ स्वयंसेवक यावरून चालत गेले.
पुन्हा १० स्वयसेवकांकडून काचेवर घाव घालण्यात आले. मात्र या ब्रीजला वापरण्यात आलेल्या काचेला कोठेही तडा गेला नसल्याचे चीनच्या सरकारी झिंहुआ न्यूज एजन्सीने म्हटले आहे.
या उभारण्यात आलेल्या ब्रीजला वापरण्यात आलेली काच प्रत्येकी तीन बाय ४.५ मीटर आणि १५ एमएम जाडीची असून असे ९९ तुकडे एकत्र केलेले आहेत. यातील नुकसानग्रस्त काच बदलता तसेच काढूनही टाकता येण्याची तरतूद करण्यात आली आहे.