ठाण्यात दरोडा नऊ कोटी रुपये लुटले

व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बँकेत भरणा करणा-या ठाण्यातील ‘चेकमेट’ नामक कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यावेळी ७ अज्ञात दरोडेखोरांनी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवत कंपनीतील सुमारे ९ कोटी रुपयांची रोख रक्कम लुटली. शिवाय कंपनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या रेकॉर्डरसह पाच कर्मचा-यांचे मोबाईल आणि सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतील काडतुसेही दरोडेखोरांनी पळवले. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे.

ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातील मेंटल रुग्णालय परिसरात हिरादीप इमारत आहे. या इमारतीच्या तळघरात ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीचे कार्यालय आहे. ही कंपनी बडे व्यावसायिक, दुकानांकडून रोख रक्कम जमा करुन ती दुस-या दिवशी बँकेत भरते. रक्कम रात्रभर कंपनीच्या कार्यालयात ठेवली जाते. यासाठी कंपनीत ३ शिफ्टमध्ये ८५ कामगार काम करतात. सोमवारीही ११ कोटी रुपये कंपनीच्या कार्यालयात ठेवले होते. मात्र मंगळवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास दोन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या सात सशस्त्र दरोडेखोरांनी कंपनीच्या दोन सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवत कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर त्यांनी कंपनीतील १७ कर्मचा-यांना एका बाजूला केले. त्यानंतर कंपनीतील ९ कोटी रुपयांची रोख लुटली. त्यानंतर कंपनीतील सीसीटीव्ही तोडून त्यांचा रेकॉर्डरही (डीव्हीआर) त्यांनी चोरुन नेला.

शिवाय कुणी पोलिसांना फोन करु नये, यासाठी पाच कर्मचा-यांचे मोबाईल आणि सुरक्षारक्षकाने पळून जाताना गोळीबार करू नये म्हणून त्याच्या बंदुकीतील काडतुसही त्यांनी काढून नेले. स्वत: पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या कंपनीत मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम बाळगली जात असल्याबाबत स्थानिक पोलिसांना माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या घटनेनंतर घटनास्थळी भेट देणा-या बडय़ा पोलीस अधिका-यांनाही यामुळे धक्का बसल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे कंपनीने आपल्या व्यवहारांची माहिती पोलिसांपासून का लपवली होती? असा प्रश्न उपस्थित झाला असून कंपनीला त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर असलेला अतिविश्वासही चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *