ब्रेक्झिट’चा जागतिक फटका आता जाणवू लागला आहे. अमेरिकेतील निवडणुका, भूराजकीय तणाव, चलन बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याचा भाव वर्षाअखेपर्यंत ३३,५०० रुपयांवर जाणार आहे, अशी माहिती आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
‘ब्रेक्झिट’नंतर जगात अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव पुन्हा वधारला आहे. येत्या सहा महिन्यात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमला ३३,५०० रुपये होईल, असे कॉमट्रेज रिसर्चचे संचालक ग्यानशेखर त्यागराजन यांनी सांगितले. ब्रिटनने युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या दरात ८.२ टक्क्यांनी वाढ झाली.
युरोपीयन महासंघ व ब्रिटन पतधोरणात विविध सवलती देण्याची शक्यता आहे. तसेच या अर्थव्यवस्थांना बळ देण्यासाठी पॅकेज देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
अॅँजेल ब्रोकिंगचे सहाय्यक संचालक नवीन माथुर म्हणाले की, अमेरिकन डॉलर्स कमकुवत होण्याची शक्यता आहे. अल्पकाळासाठी ३१,५०० ते ३२,५०० रुपये प्रति ग्रॅम सोन्याचे दर राहतील, असे त्यांनी सांगितले.