ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. ब्रिटनने युरोपिय महासंघात रहावे की बाहेर पडावे, यासाठी झालेल्या मतदानात येथील जनतेने युरोपीय महासंघाच्या बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून कॅमेरॉन यांनी भाषण केले.
निकालामुळे नाराज झालो असलो तरी जनमताचा आदर करायलाच हवा, त्यामुळे नैतिक पराजय मान्य करत राजीनामा देण्याची त्यांनी घोषणा केली.
कॅमेरॉन हे तीन महिने पंतप्रधानपदी राहतील. येत्या ऑक्टोबरमध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाची परिषद होणार आहे. त्यावेळी ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण असेल ते जाहीर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवे पंतप्रधान महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करतील आणि २०१९ मध्ये अधिकृतपणे ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडेल, असे कॅमेरॉन म्हणाले.