जिवंतपणी यकृत दान करून मुलाने वडिलांचे प्राण वाचविण्याची पहिली घटना पुण्यातील वैद्यकीय इतिहासात नुकतीच नोंदविण्यात आली. देशात प्रौढांमधील पहिले यशस्वी यकृतदान वीस वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर प्रथमच शहरात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे जिवंतपणी दान केलेल्या यकृताचे प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या चेन्नई, बंगळूर, दिल्ली, मुंबई, कोलकाता या यादीमध्ये पुण्याचा समावेश झाला आहे.
23 वर्षांच्या मुलाने यकृताचा दान केलेला काही भाग त्याच्या वडिलांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आला. काविळीमुळे वडिलांचे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते. त्यांना गेल्या काही दिवसांमध्ये उपचारांसाठी वारंवार रुग्णालयात दाखल केले होते. यकृत प्रत्यारोपण हा त्यांचे प्राण वाचविण्याचा अखेरचा मार्ग होता. यकृतदानाच्या प्रतीक्षा यादीवर नाव नोंदविले तरीही ते कधी मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यात वेळ घालविणे धोक्याचे होते. त्यामुळे वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी मुलाने यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. रुबी हॉल क्लिनिकमध्ये गेल्या आठवड्यात यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, शुक्रवारी (ता. 24) रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. प्रौढाने दान केलेल्या यकृत लहान मुलामध्ये प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया यापूर्वी पुण्यात झाली आहे. मात्र, प्रौढाने प्रौढाला दान केलेल्या यकृताच्या प्रत्यारोपणाची ही पहिली वेळ आहे.
यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शीतल धडफळे महाजनी म्हणाल्या, “”प्रौढाने प्रौढाला दान केलेल्या यकृताचे प्रत्यारोपण ही गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया आहे. या प्रत्यारोपणासाठी मुलाच्या यकृताचा 65 टक्के भाग म्हणजे सुमारे 700 ग्रॅम घेण्यात आला. त्या भागाचे त्याच्या वडिलांमध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. दान केलेले आणि प्रत्यारोपण केलेल्या अशा दोन्ही यकृतांची पुन्हा नैसर्गिक वाढ होते. पुढील सहा ते आठ आठवड्यांमध्ये हे यकृत पुन्हा पूर्ण विकसित होईल. यकृत दान केलेल्या मुलाचे महिन्याभरात तर, त्याच्या वडिलांचे तीन महिन्यांमध्ये आयुष्य पूर्ववत होईल.‘‘
एक महिना व्हिटॅमिनची औषधे घ्यावी लागतील. शरीराने या यकृत स्वीकारण्यासाठी वडिलांना आयुष्यभर काही औषधे घ्यावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. मनीष वर्मा आणि डॉ. कमलेश बोकील यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली.
लोणी काळभोरमध्ये छोट्या हॉटेलचा व्यवसाय करून दिनचर्या चालविणाऱ्या या कुटुंबासाठी या मोठ्या शस्त्रक्रियेचा खर्च आवाक्याबाहेरच होता. त्यासाठी रुग्णालयाकडून आर्थिक मदत उभारण्यात आली. वैद्यकीय समाजसेविका सुरेखा जोशी यांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून या शस्त्रक्रियेचा निधी उभारला.
– यकृताचा कर्करोग आणि गंभीर आजारात यकृत प्रत्यारोपणाची गरज लागते.
– जिवंत माणसाच्या यकृताचा काही भाग काढून त्याचे निकामी झालेल्या रुग्णामध्ये प्रत्यारोपण केले जाते.
– यकृताचा भाग काढल्यानंतरही पुन्हा वाढ होणारा हा शरीरातील एकमेव अवयव आहे.
– अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष, कुशल डॉक्टरांची या शस्त्रक्रियेसाठी गरज असते.