मंत्रीपदाचा गैरवापर करून शिवसेनेचे आमदार व गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आरे येथे कोट्यवधी रुपयांची २० एकर जमीन हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे.
मुंबई- भाजपाच्या मंत्र्यांची गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे गाजत असतानाच आता आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून शिवसेनेचे आमदार व गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आरे येथे कोट्यवधी रुपयांची २० एकर जमीन हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. वायकर यांनी येथे अनधिकृत व्यायामशाळा बांधली असून त्यासाठी सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. वायकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी केला.
आपल्या पदाचा गैरवापर करून आरेतील जमीन हडपणा-या वायकर यांना मंत्रीपदावरून तात्काळ हटवून त्यांचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.
भाजपाच्या मंत्र्यांनंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांच्या जमीन हडपण्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात वायकर यांच्या पत्नीच्या संबंधित असलेल्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेला ३५० मीटर जागा मंजूर झालेली असताना त्यांनी आजूबाजूची २० एकर जमीन हडपली आहे. मंजूर झालेल्या जागेवर अनधिकृत पहिला मजला तसेच स्टीम व सोना बाथ आणि ३० ते ३५ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. ही संस्थाही नोंदणीकृत नसून या संस्थेत वायकर यांचे नातेवाईक असल्याचेही निरुपम यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. या २० एकर जमिनीची किंमत २० ते ३० कोटींहून अधिक आहे.
या जमिनी हडपणा-या शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्र देणार आहोत. वायकर यांच्या तात्काळ राजीनाम्यासोबतच त्यांच्यावर कारवाई करून एफआयआर दाखल करावा, तसेच अनधिकृत बांधकाम पाडून टाकावे, आदी आपल्या मागण्याही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. त्यानंतर जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही लोकआयुक्तालयातही जाणार असल्याचे निरुपम म्हणाले.
आदिवासी विकासाच्या नावावर जमिनीची लूट
आदिवासी विकासाच्या नावाखाली गैरप्रकार केले जात आहेत. आरेने म्हाडाला वारंवार संबंधित बांधकाम व जागेवरील अतिक्रमण याबाबत पत्रव्यवहार केला तरीही कारवाई झाली नाही. राज्यमंत्री वायकर असल्यामुळे आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर वायकर हे आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करून अजून एक मातोश्री व सुप्रीमो क्लब तयार करत आहेत. आरे येथे विकासाला विरोध करणारे आदिवासींचे नाव पुढे करून शिवसेनेचे नेते जमिनीची लूट करत असल्याचेही निरुपम म्हणाले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर तसेच प्रवक्ते अरुण सावंत उपस्थित होते.