एखाद्या गाण्यावरून चित्रपट बनविण्याची आणि गाण्याच्या गीतकारानेच त्या चित्रपटातील प्रमुख भूमिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर संदीप खरे म्हणाला, ‘मी एका बाबाची व्यथा गाण्याच्या माध्यमातून मांडली होती, त्यापुढे जाऊन या चित्रपटातून समाजातील परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वत:च कवितेशी जोडलेलो असल्याने ते अभिनयातून उतरविणे सोपे गेले. त्यात सहकलाकारांचे खूप सहकार्य मिळाले.‘‘
‘प्रेक्षकांना एक सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. कोणताही मसालापट मला करायचा नव्हता. आपल्या भोवतालची परिस्थिती, वडिलांची व्यथा यावर हा चित्रपट भाष्य करतो. त्याचबरोबर नितीन चव्हाणची “ओझं‘ ही एकांकिका पुरुषोत्तम करंडकमध्ये पहिल्या दहामध्ये आली होती. त्यावर आधारित पटकथेची मांडणी करण्यात आलेली आहे.
‘येत्या “फादर्स डे‘च्या निमित्ताने जगातील सर्व बाबांना प्रेमाची भेट म्हणून हा चित्रपट आम्ही देत आहोत,‘‘ असे दिग्दर्शक योगेश जाधव यांनी सांगितले.
हा पालवी क्रिएशन्स प्रस्तुत, विशाल धनवडे आणि नितीन चव्हाण निर्मित आहे. वडील-मुलीच्या नात्याचे सुंदर दृश्य गीतकार संदीप खरे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्या अभिनयातून दिसणार आहे. तसेच किशोर कदम, आस्ताद काळे, ज्योती चांदेकर, दीप्ती भागवत आणि प्रवीण तरडे या कलाकारांचा पण या चित्रपटात अभिनय आहे.