पावसामुळे मुंबईची तिन्ही मार्गावरील जीवनवाहिनी कोलमडली असतानाच रखडलेल्या मध्य रेल्वेच्या लोकलच्या लगेज डब्यात एका महिलेने बाळाला जन्म दिला. हि महिला दिवा येथील रहिवाशी असून तिचे नाव गुडीया प्रमोद गुप्ता आहे.
पावसामुळे उपनगरीय गाड्या मंगळवारी सकाळपासूनच उशिराने धावत आहेत. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी पाहायला मिळत असताना प्रसुतीकळा असह्य झालेल्या एका महिलेने लोकलच्या लगेज डब्यात बाळाला जन्म दिला.
या महिलेने दिवा स्थानकातून सीएसटीकडे जाणारी लोकल पकडली होती. लोकल रखडली असल्यामुळे त्यांना दवाखान्यात जाता आले नाही.
त्यानंतर भांडुपला ही लोकल आल्यावर त्या महिलेला गाडीतून उतरवण्यात आले. तसेच जवळच्या सावित्रीबाई फुले प्रसुती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. त्यांना मुलगी झाली असून, तिची प्रकृती उत्तम आहे. मुलीचे वजन २ किलो ७०० ग्रॅम आहे.