आसारामची बेहिशेबी मालमत्ता २३०० कोटी

प्राप्तिकर खात्याच्या तपासात माहिती उघड

राजस्थानातील आश्रमात अल्पवयीन मुलीवर २०१३ साली बलात्कार केल्यावरून अटकेत असलेला आसाराम बापू याची बेहिशेबी मालमत्ता २३०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्राप्तिकर खात्याने केलेल्या तपासात उघड झाले असून सरकारने त्याच्या करसवलती मागे घेण्याची सूचना प्राप्तिकर खात्याने केली आहे.

आसाराम बापूने २००८-२००९ पासून ही माया गोळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोलकात्यातील सात कंपन्या त्याने विकत घेतल्या होत्या आणि त्यांच्यामार्फत रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, किसान विकास पत्रे आणि बँकेतील ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती. तो व्याजावर रक्कमही फिरवत होता. आसाराम अनेक व्यक्ती व कंपन्यांना महिन्याला १ ते २ टक्के  व्याजदराने मोठी रक्कम देत होता. त्याने १९९१-१९९२ पासून देशातील सुमारे १४००जणांना ३८०० कोटी रुपये कर्जाऊ दिल्याचे उघडकीस आले. त्यात अनेक बिल्डरांचाही समावेश आहे. आश्रमाला मिळणाऱ्या देणग्यांच्या नावाखाली हे व्यवहार लपवले जात असत.

यासंबंधी आश्रमाच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी सांगितले की, हा बापूजींच्या विरोधातील कट असून हिंदू धर्मावरील थेट हल्ला आहे. बापूजींच्या मालकीची कोणतीही मालमत्ता नाही. सर्व मालमत्ता न्यासाच्या  नावावर आहे. गेली तीन वर्षे त्यांना अटकेत ठेवूनही त्यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत.  आसारामचे वकील चंद्रशेखर गुप्ता यांनी सांगितले की, आपण आसारामच्या फौजदारी खटल्यापुरते काम पहात असून प्राप्तिकर खात्याच्या तपासासंदर्भात काही भाष्य करू शकत नाही.

मायेचा विळखा..

  • प्राप्तिकर खात्याचे आजवर ११ शहरांमधील आसारामच्या मालकीच्या ७१ ठिकाणांवर छापे.
  • छाप्यात २२००० कागदपत्रे आणि ३०० गिगाबाइट्सचा डाटा हस्तगत.
  • देशातील ४०० आश्रमांना कर सवलती मिळत असूनही त्याच्याकडून गेल्या २० वर्षांत प्रत्यक्ष उत्पन्नाच्या केवळ १० टक्के उत्पन्न जाहीर.
  • ऑक्टोबर २०१३ मधील कागदपत्रांवरून आश्रमाला एका वर्षांत व्याजापोटी ४१४ कोटी रुपये मिळाल्याचे स्पष्ट तसेच १६३ कोटींची रोकड उघडकीस.
  • आजवर त्याच्याकडून ७ कोटीची रोकड हस्तगत. त्याच्या ५०० कोटी रुपये किमतीच्या १२१ मालमत्तांवर हंगामी जप्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *