योगाला आयुष्याचा भाग बनवा – मोदी

मोबाईल फोन ज्याप्रमाणे तुमच्या आयुष्याशी निगडीत विषय बनला आहे. तसेच योगालाही तुमच्या जीवनाचा भाग करून घ्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योद दिनानिमित्त दिला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी सुमारे तीस हजार नागरिकांच्या साथीने योगासने केली. यावेळी पंतप्रधानांनी योगाला कर्मकांडाशी जोडू नका, असाही सल्ला दिला.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत योग दिनाचा मुख्य कार्यक्रम चंडीगडमध्ये झाल्याने येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सुमारे तीस हजार नागरिक या वेळी उपस्थित होते. कॅपिटॉल कॉम्प्लेक्‍समध्ये झालेल्या प्रमुख कार्यक्रमासह शहरभर जवळपास 180 केंद्रांमध्ये योग दिन साजरा करण्यात येत आहे. योग दिनानिमित्त गेल्यावर्षी राजपथावर पंतप्रधानांनी योगासने केली होती. आता चंदीगडमध्ये ते योगाभ्यास करताना दिसले.
राजपथावर रविवारी योगसरावामध्ये योगगुरू रामदेवबाबा, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, खासदार मीनाक्षी लेखी, मनोज तिवारी आणि इतर भाजप नेते सहभागी झाले होते. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फरिदाबादमध्ये बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमात जवळपास 1 लाख नागरिक उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते.

देशभरात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. केंद्र सरकारनेही योग दिन जोरदार साजरा करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर झाल्यानंतरचा हा दुसरा योग दिन आहे. विविध संस्था, महिला गट, ज्येष्ठ नागरिक संघ आणि शैक्षणिक संस्थांनी या योगासने करण्यात उत्साहाने सहभाग घेतला भारताबरोबरच परदेशांतही योगप्रेमींनी विविध योग शिबिरांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. विविध देशांमधील भारतीय दूतावासांनीही त्या त्या देशांशी संपर्क साधून योग दिनाची तयारी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *