दाभोलकरांच्या मारेक-यांना मनोहर कदमने शस्त्र पुरवल्याचा आरोप

दाभोलकरांच्या मारेक-यांना मनोहर कदमने शस्त्र पुरवल्याचा आरोप

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पुतळा विटंबनेनंतर झालेल्या गोळीबारात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक मनोहर कदम यांचा ‘सनातन’शी संबंध असल्याचे सीबीआय तपासात पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये कदम यांचा थेट सहभाग असल्याचा संशय सीबीआयला आहे. या प्रकरणी सीबीआय कदमसह अन्य दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलीस अधिका-यांची चौकशी करीत आहेत. दरम्यान, मनोहर कदम याचा ‘सनातन’शी संबंध असल्याचे कळताच पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेत कदम विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम सध्या निवृत्त आहेत. रमाबाई आंबेडकर नगरमधील दंगलीत कदम यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. त्यानंतर त्यांनी ‘सनातन’च्या साधकांना प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे.

त्यात फरार आरोपी सारंग अकोलकर, रुद्र पाटील, विनय पवार आणि प्रवीण निमकर यांना प्रशिक्षण मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेली रिव्हॉल्वर बनविण्यात पोलीस अधिका-यांनी मदत केल्याचा संशय आहे.

विशेष म्हणजे सध्या सेवेत असलेल्या एका पोलीस अधिका-याने ‘सनातन’वर काय कारवाई सुरूआहे, याची माहिती सनातनला दिल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे.

..तर दाभोलकर वाचले असते

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती. मॉर्निग वॉकला गेले असताना ओमकारेश्वर पुलाजवळ दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दोन हल्लेखोरांपैकी सारंग अकोलकर यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही सीबीआयने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *