राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा बुधवारी सुरू होत आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या अक्षम्य बेफिकीरीमुळे सरकारी, स्थानिक संस्था आदी शाळांमधील ३८ लाख ९५ हजार ५६ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी नवीन गणवेशाविनाच शाळेत पाऊल टाकावे लागेल.
शिक्षण विभागाकडून गणवेशांच्या नियोजनाची काहीही तयारी नसल्यामुळेच मुलांचा हा हिरमोड होणार असून, या लाखो विद्यार्थ्यांना येत्या महिन्याभरातही गणवेश मिळणे अशक्य असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील महापालिका, पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सुमारे ७० हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकणा-या अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्रयरेषेखालील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार नियमानुसार या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत वर्षभरासाठी दोन मोफत गणवेषाचे वाटप करण्याची योजना राबवण्यात येते. या सर्व विद्यार्थ्यांना नव्या गणवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.
यंदा केंद्राकडून सर्व शिक्षा अभियानाला देण्यात येणा-या निधीमध्ये मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात आल्याने यासाठीची परिस्थिती उद्भवली असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्राकडून देण्यात आली.
गणवेशासाठीची तरतूद
दोन गणवेशांसाठी प्रति विद्यार्थी ४०० प्रमाणे
विद्यार्थ्यांची संख्या- ३८ लाख ९५ हजार ५३
एकूण तरतूद : १ कोटी ५५ लाख ८२ हजार २१२
राज्य सरकारची तरतूद-
प्रति मुलींसाठी -६९ रुपये
प्रति मुलांसाठी -५७ रुपये
सर्व शिक्षा अभियानांतर्गत अतिरिक्त तरतूद
दोन गणवेशासाठी प्रति विद्यार्थी
प्रति मुलींसाठी- ३३१ रुपये
प्रति मुलांसाठी- ३४३ रुपये
