कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद बनवण्याचं काम आजपासून कोल्हापूर जेलमधील महिला आणि पुरुष कैद्यांकडून करून घेतलं जाणार आहे. कोल्हापूर कारागृहाचे अधिक्षक आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरमध्ये दर्शनाला येणार्या भाविकांना प्रसाद म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ५ रुपयांमध्ये लाडूचा प्रसाद दिला जातो. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांनी देवस्थान समितीकडे लाडूचा प्रसाद महिला कैद्यांकडून तयार करून घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र कैदी महिलांनी प्रसाद केला तर त्या प्रसादाचं पावित्र्य जपलं जाणार नाही, असा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केला होता यावरून वादही झाला होता. अखेर कोल्हापूर कारागृहाच्या अधिक्षक आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये एकूण ७० महिला कैदी आहेत. या महिलांकडून हा प्रसाद बनवून घेणार आहे. कैद्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून सकारात्मक भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.