मुंबईत शनिवारी सकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्या आहेत.
मुंबईकरांना पहिल्याच पावसाचा जोरदार फटका बसला असून तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे कोलमडली आहे. सकाळी कामावर निघालेल्या ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो आहे.
मध्य रेल्वेवर सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.
तर हार्बर रेल्वे मार्गावरही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतूक कोलमडली आहे.
सीएसटीच्या दिशेने जाणा-या स्लो व फास्ट मार्गांवरील लोकलच्या ओव्हरहेड वायरमध्ये मुलुंड स्थानकात स्पार्किंग झाल्याने प्रवाशांनी धडाधड उड्या मारत गाडी रिकामी केली.
दरम्यान, दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात पावसाने सकाळी हजेरी लावली. ठाणे, मुलुंड, दादर, लोअर परळ, वरळी, बांद्रा, अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. तर पश्चिम उपनगरातील अन्य भागात मात्र पावसाने हुलकावणी दिली.