माळेगाव बुद्रुक येथे एका दलित महिलेला शेतात पाऊल ठेवल्याच्या कारणावरून संतप्त शेतकरी दादा सणस याने उसाने मारहाण केल्याप्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’ व मारहाणीचा गुन्हा गुरुवारी (दि. 9) रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कमल कोंडीबा सोनवणे (वय 50) ही दलित शेतमजूर महिला गेल्या 20 वर्षांपासून अशोक तावरे यांच्या शेतामध्ये शेतमजूूर म्हणून काम करीत आहे. सोमवारी (दि. 6जून) कमल सोनवणे व लता जराड या महिला अशोक तावरे यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी शेतकरी दादा सणस यांच्या शेता जवळून गेल्या होत्या. त्यामूळे संतप्त झालेल्या दादा सणस यांनी या महिलेस तू आमच्या शेतात का आलीस, आमच्या शेतात परत पाऊल ठेवायचे नाही, असे म्हणत उसाने जोरदार मारहाण केली. या मारहाणीमध्ये दलित महिलेच्या उजव्या मांडीवर काळ्या निळ्या जखमांचे व्रण उमटले आहेत.
या बाबत कमल सोनवणे यांनी दादा सणस याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य संतोष भोसले, रिपाइं युवकाध्यक्ष विश्वास भोसले, प्रशांत मोरे, अशोक जगताप, मिलिंद सोनवणे, पप्पू खरात, दादा सकट, सुभाष भोसले यासह आदी दलित कार्यकर्त्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी माळेगाव पोलिस दूरक्षेत्राच्या ठिकाणी धाव घेतली. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाई करावी, यासाठी ठिय्या मांडला.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तालुका पोलिस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी माळेगाव पोलिस तातडीने दूरक्षेत्राला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली व कमल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उसाने मारहाण करणार्या दादा सणस या इसमावर भा.दं.वि. कलम 326, 506 नुसार व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर हे
करीत आहेत.