महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल 89.56 टक्के लागला असून, मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 96.56 टक्के निकाल लागला आहे.
दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका आणि कलअहवाल 15 जूनला दुपारी तीन वाजता शाळेमार्फत देण्यात येतील, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी रविवारी जाहीर केले.
राज्य मंडळाच्या पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणार, अशी शक्यता वर्तविण्यात आल्याने विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोचली होती. सोमवारी विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख आणि कलचाचणीचा कलअहवाल यांचे वाटप विभागीय मंडळामार्फत 15 जून सकाळी अकरा वाजता करण्यात येईल. त्याचदिवशी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, कलअहवाल यांचे वाटप माध्यमिक शाळांमार्फत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आणि मोबाइलद्वारेही पाहता येणार आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी उपयुक्त संकेतस्थळ :
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
