भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात एका दलित कुटुंबासोबत जेवण केल्याचा विषय सध्या गाजत असताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. दलिताच्या घरी जेवण केल्याची अमित शहा यांची ही कृती म्हणजे एक नाटक असल्याची टीका त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर अमित शहा यांच्यासाठी जेवण बनविणा-या स्वयंपाक्याच्या शोध घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
उत्तरप्रदेश दौ-यावर असताना अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातील जोगियापूर गावात एका दलित कुटुंबासोबत भोजन केले. मात्र अमित शहा यांनी दलिताच्या घरात जेवण घेतले असले तरी त्यांचे जेवण बनविणारा दलित नव्हता, असा संशय मायावती यांना आहे.
त्यामुळेच मायावती यांनी त्या स्वयंपाक्याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाचे विभागीय समन्वयक डॉ. रामकुमार कुरील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमित शहांनी ज्या घरात जेवण घेतले ते कोणी बनवले होते. त्याचा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊ, असे कुरील म्हणाले.
शहा यांच्यासोबत त्यावेळी २५० अधिक मंडळी होती. मात्र जेवणाच्या पंगतीच्या वेळी केवळ ५० जणच उपस्थित होते. यावरून त्यांची जातपात विषयक विचारसरणी उघड होते, अशी टीका मायावती यांनी केली आहे.